Friday, June 25, 2021

बाप.......नेहमीच आभाळासारखा, घराच्या स्तंभा सारखा, कडूलिंबा सारखा उभाच असतो बाप....

बाप.......नेहमीच आभाळासारखा, घराच्या स्तंभा सारखा, कडूलिंबा सारखा उभाच असतो बाप....

बाप


बाप.....
 किती ही लांब असलं तरी आभाळच छत, असतंच धीर देत ठाम माथ्यावर. एक एक खपली निघे पर्यंत, उभा असतो लाकडी खांब आधार देत पडक्या भिंतीच्या घरालाही.

अंगणातल्या कडूलिंबा सारखा, काहीच न मागता उभा असतो छाया देत वर्षानुवर्ष, वावटळातही घट्ट धरून असतो मातीला. नेहमीच आभाळासारखा, घराच्या स्तंभा सारखा, कडूलिंबा सारखा, बाप उभाच असतो मूळ घट्ट जपून. 

         मायेच तलाव, नदी सारखा ओला नसला तरी, जमिनीतल्या पाण्या सारखा, साठवून ठेवतो काळजात गोड प्रेमाचा झरा. घाम गाळायला शिकवतो, दुष्काळातही तहान भागवतो, रखरखत्या उन्हातही जगवग ठेवतो, रुक्ष, निर्जीव वाटत असला तरी जमिनी सारखा काळजातुन,  तहान भागवणारा ओला असतो बाप ! 

       दुनियेच्या बेटावर कसलाच नसतो आधार, भर खारट समुद्राच्या मध्ये जेव्हा नसतो, नदी, ओढा, तलाव, बाहेरून कडक असणाऱ्या नारळा सारखा आतून गोड,मऊ, सगळं हरल्या
सारख वाटत तेव्हा, लढत पडत जगायला शिकवतो बाप ! सहज काहींचं न देता, दुनियेच्या वाळवंटात नेहमी खळग्या सारखा आधार असतो बाप ! 

Thursday, June 24, 2021

सुरत ते चंदीगढ आणि तिथून नारकंडा बुलेट ट्रीप

सुरत ते चंदिगढ आणि तिथून नारकंडा बुलेट ट्रिप - मकरंद जोशी 

 भारत विविधतेने नटलेला देश आहे. विविध उत्सव, भाषा, लोक, परंपरा इतिहासाची त्याला एक्याची पृष्ठभूमी आहे हे आपण वाचत आलोय...ऐकत आलोय पण जो पर्यंत आपण स्वता: बाहेर पडत नाही, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत नाही, त्या संस्कृती, लोक, ठिकाणं आणि आपला देश म्हणजे नेमकं काय याचा अगदी जवळून अनुभव आपल्याला होत नाही  तो पर्यंत आपल्याला भारत निटसा कळत नाही असं मला जाणवलं आणी मी मित्रां सोबत सुरत टु नारकंडा हिमाचलच्या बुलेट ट्रीपला निघालो.

    चला तर मग आज तुमच्याशी मी पाहिलेला अनुभवलेला हिमाचल शेर करतो. नारकंडा हे हिमाचल शहरा मधील एक बर्फाच्छादीत शिखरं आणि हिरव्यागार वनराईत वसलेलं सुंदर नगर आहे. ते भारत तिबेट नेशनल हाईवे नंबर 5 वर आले आहे. जानेवारी मध्येच आम्ही चार मित्रांनी नारकंडाच्या बाईक ट्रिप वर जायचं ठरवलं आणि महिन्या पूर्वी रेल्वे बुकिंग केली परंतु तिकीट काही कन्फर्म झाल्या नाहीत. बघता बघता प्रवासाची तारीख म्हणजे 11 फेब्रुवारी जवळ येऊन ठेपली शेवटी आम्ही जो शेवटचा पर्याय होता की ज्या गाडीत रिझर्वेशन मिळेल ते घ्यायचं आणि दिल्ली गाठायची आणि पुढचा प्रवास करायचा, तेच केलं. झालंही नेमकं तेच रिझर्वेशन न मिळाल्याने आम्ही 11 फेब्रुवारीची रात्रीची ट्रेन शोधली तर शेवटी राजधानी मध्ये जागा मिळाली,  राजधानी महाग पण म्हटलं असो..दुसरा मार्ग नव्हता दिल्ली जाण्याचा.  शेवटी 11 फेब्रुवारीला आम्ही सुरत स्टेशनहून गाडीत बसलो एका वेगळ्याच रोमांचक अनुभवासाठी !

      नारकंडा समुद्र सपाटी पासून 2708 मीटर उंचीवर वसलेलं नगर आहे. हिमालयाच्या बर्फाळ पर्वतीय श्रुंखला आणि दरीत हिरवी गच्च जंगलं हे त्याचे सौंदर्य डोळ्यात भरणारे आहे. त्यामुळे तिथे एन हिवाळ्यात जाण्यासाठी विशेष सर्व तयारी केली होती...फेब्रुवारी म्हणजे ऐन हिवाळा आसणार आणि तोही हिमाचालचा ! जो तिथे जाऊन कळला ! तिथला हिवाळा कसा असतो ते ! तरी काही ट्राव्हेल्स ब्लॉग वाचले होते. चंदीगढहून पुढचा संपूर्ण प्रवास हा बुलेट वरच असल्याने त्यानुसार तयारी केली होती. थंडीचे जॅकेट, थर्मल, काही औषधी, हॅन्डग्लोस, शूज, सॉक्स, एकंदरीत सगळे गरम कपडे घेतले होते.पांघरून, व्हीक्स, ताप, डोके सुखी सगळ्या गोळ्या औषधं घेतले होते ! 

        ट्रेन चालायला सुरुवात झाली, रोमांच आणि कुतूहलाच्या हळव्या लाटा मनाच्या किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. उशिरा पर्यंत काय काय कसं जाणार वगैरे गप्पा करत आम्ही झोपलो, सकाळी गाडी दिल्लीला आली, तिथून निजामुद्दीनहून 2 तासाने दिल्ली टू चंदिगढ ट्रेन होती. दिल्ली मध्ये आपल्या कडच्या थंडी पेक्षा थंडी वेगळी असते हे कळायला वेळ लागली नाही. निजामुद्दीनला जाऊन सर्वात आधी स्टेशन जवळच गरमा गरम आलु पराठे हाताळले. तुफान से पहले की शांती सारखी थंडी होती ! आणि पुढे तुफान सारखा अनुभव येणार होता ! नाश्ता आटोपून आम्ही गाडीत बसलो! मला आठवलं त्या दिवशी पानिपत शौर्य दिवस होता आणि आमची ट्रेन पानिपत स्टेशनला लागली. माझ्या मनात पानिपत, सदाशिवभाऊ पेशवे, शिंदे सरदार होळकर,  अहमदशाह अब्दाली, सगळा इतिहास मनात उभा होत होता !  थेट महाराष्ट्रातून त्या काळी रेल्वे वगैरे काही नसतांना देशासाठी इतक्या लांब येऊन, इतक्या थंडीत एका दिवसात लाख मराठे निधड्या छातीने देशासाठी लढत हुतात्मे होतात ! आणि “बचेंगे तो और भी लढेंगे” चा घोष देतात ! काय तो देशाभीमान काय ती उंची आणि अस्मिता ! प्रचंड गौरव आणि अस्मितेने भारावून गेलो होतो ! म्हटलं मराठ्यांच्या समर्पण आणि राष्ट्रभक्तीने पावन झालेल्या मातीचा स्पर्श व्हायला हवा ! इतरांना ते एक रेल्वे स्टेशन होतं पण माझ्यासाठी ती वीर भूमी होती, मी मित्रांना सांगितलं की मी बाहेर जातोय आणि रेल्वे स्टेशनवर उतरलो ! साध्या प्लॅटफॉर्मवर देखील उतरून मी गौरवाने ओसंडून वाहत होतो. प्लेटफॉर्मच्या "पानिपत" फलका समोर उभा राहून फोटो काढला ! काही वेळ मौन फक्त उभाच होतो पानिपत चा सारा इतिहास एखाद्या लाटे वर स्वार होऊन माझ्या समोर उभा राहिल्या सारखा विशाल आणि उत्तुंग आठवत होता. मनोमनी मी त्या मराठा शौर्याला वंदन करीत होतो ! स्वराज्याचा भगवा जरीपटक्याचा ध्वज ह्या आसमंतात गरजत फडकला होता. गाडीचा भोंगा वाजला आणि मी गाडीत शिरलो मित्रांना ठाऊक होतं ! पानिपत च्या इतिहासाची चर्चा सुरू झाली बघता बघता संध्याकाळ व्हायला आली होती, ट्रेन मध्ये स्थानीक लोकं थंडीशी परिचितच होते म्हणुन सर्वानी गरम जेकेट, कानटोपी वगैरे घातले होते. चंदीगढ जवळ आलो होतो, आसपासचे लोकं, कपडे, भाषा, रोजच्या पेक्षा वेगळं होत ! शेवटी अंधार झाला आणि आम्ही चंदीगढला पोचलो. इथून पुढे ज्याला आपण थंडी म्हणतो त्याला काही वेगळा शब्द असायला हवा इतकी जास्त थंडी जाणवत होती. रेल्वे मध्ये सुद्धा 4 मित्रांपैकी कुणी खिडकी जवळ बसायला तयार होत नव्हता ! एव्हना उगाच फुशारक्या मारणारे मित्र ह्या थंडी समोर हात टेकत होते ! आणि आपण "मनुष्य आहोत आणि आपल्या काही मर्यादा आहेत" ह्या समजदारीच्या उतरंडीला येऊन पोचले होते. 

      चंदीगढला “रघुबीर बाईक रेन्टल" वर अगोदरच आम्ही 2 बुलेट बुक केल्या होत्या ! पोचुन गाड्या तपासून घेतल्या, एडवान्स फी पे केली. परंतु थंडी इतकी प्रचंड वाढली होती की रात्री चंदीगढलाच थांबायचं आम्ही ठरवल. ऑनलाइन  हॉटेल शोधली आणि,  आदिमानव काळात थंडीच्या भीतीने जसा आदिमानव वेळीच गुफेत शिरत असेल तसे आम्ही पटापट हॉटेल गाठल आणि आत शिरलो. हाश ! रुम बाहेर पेक्षा उबदार होती, पण फ्रीझर मधल्या पाण्याच्या बाटली सारखे आम्ही गारठलो होतो. फक्त ऊब लागून थंडी जात नव्हती ! शेवटी गरम पाण्यात पाय भीजवले आणि बरे वाटले. बाहेर जाण्याची हिम्मत नव्हती रूम मधेच गरमा गरम जेवण करून  जाड पांघरून घेऊन झोपून गेलो. प्रवासाच्या थकाव्याने झोप लगेच लागली ! पहाटे उठून “रघुबीर बाईक रेन्टल"च्या ऑफिसला गेलो गाडी तपासली, त्याने गाडीला आजू बाजूला केरियर बसवून दिले. आम्ही गाडीचा विडीयो शुट करुन घेतला. जेणे करुन काही नुकसान झाल्यास समजावे. तशी ती सिस्टमच आहे. त्याने काही सूचना दिल्या काही अनुभव संगीतले. थंडी मध्ये आणि हिमाचल सारख्या डोंगराळ भागात किमान 350 सीसीची बाईक चांगल पिकअप आणि साथ देते. अनेकदा गाडी रस्त्यात बंदही पडते. पेट्रोल फुल भरलेले नेहमी सोयीस्कर असते. त्यामुळे आम्ही नवी आणि चांगली गाडी निवडली. गाडीच्या केरीयरला बॅग्स बांधून आम्ही ट्रिपला निघायला तैयार होतो ! हातात ग्लोझ असूनही थंडी प्रचंड असल्याने जाणवत होती ! चंदीगढ शहर असे पर्यंत जी आम्हाला थंडी वाटत होती ती डोंगरी रस्ता लागताच अधिक वाढली होती. आणि छान वाटत होते. हिमाचल हा मुळात हिमालयाचा पायथा ! पायथ्याचे डोंगरं पर्वता सारखेच म्हणावे लागतील असे उंचच उंच लांब पर्यंत पसरले होते ! हळूहळू डोंगराला वळसा घालून बनलेला हाईवे सुरू झाला होता ! सपाट प्रदेशात चार पदरी हाईवे असतात तसा हा हाईवे नव्हता. डोंगराला कोरुन केलेला रुंद मार्ग होता. म्हणुन मर्यादीत गतीने आम्ही मार्गाचा आनंद घेत पुढे सरकत होतो. अचानक डोंगराची सावली आली की हिरवळ आणि सावली मुळे जणू बादली भर पाणी अंगावर टाकावे तशे अंगावर शहारे येणारी थंडी अंगावर फेकल्यागत गारठून गुदगुल्या झाल्यगत शहारुन जात होतो ! मग सावली गेली की बरे वाटे ! 

      बघता बघता दुपारी 1 च्या
सुमारास आम्ही कसोलीला पोचलो. कसोली मध्ये जेवण वगैरे केले. काही वेळ व्युव पॉईंट बघून आम्ही शिमलाच्या दिशेने निघालो. कसोलीहुन हिमालयाची पांढरी शुभ्र बर्फाने आच्छादलेली शिखरं दिसत होती. इतक्या लांबूनही ती चक्क चकाकत होती. डोळ्यात भरत होती ! आजू बाजूच्या दर्या प्रचंड होत्या, उंचच उंच झाड ! सगळं आपल्या कडच्या भागा पेक्षा उंच, मोठं, भव्य होत. संध्याकाळ होण्याआधी शिमला गाठायचं अस आमचं ठरलं होतं. सुदैवाने आम्ही संध्याकाळच्या सुमारास शिमल्यात शिरलो. नुसती टेकडी वर घर पसरली होती. ती ही दाट आणि गीच ! रोडाच्या एका कडेला दरी आणि दरीत उतरती घरं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डोंगर आणि डोंगरावर एकावर एक चढती घरं होती. गाडी पार्किंगची पंचाईत होती ! रस्ते लहान असल्याने कुठेही उभी करू शकत नव्हते. नाही तर रस्त्यावर उभे ट्राफीक पोलीस लगेच दंड करायला तयार होते. ईथे ट्राफीक शिस्त अगदी प्रशंसनीय होती. कुणीही लाईन सोडुन पुढे निघत नव्हत. ट्रॅफिकचे नियमही काटेकोर पाळले जात होते ! पाळावेच लागतील ! रस्तेच इतके लहान ! सपाट जागाच कमी. सगळं शिमला डोंगर आणि दरीत वसलेलं ! 

    

 थंडी वाढत होती आणि रोमांचही वाढत होता. हिवाळ्यात आम्ही संध्याकाळी शिमल्यात हॉटेल शोधत होतो. रूम एडवान्स बुक केला नव्हता. फटाफट आयटी कंपनीतल्या एम्प्लॉयी सारखं ठरवलं की सर्वांनी नेट वर रूम शोधा आणि योग्य वाटल्यास फायनल करा. कारण वाढत्या थंडी सोबत रेट पण इथे वाढत होते. इंदिरागांधी मेडीकल कॉलेज व रुग्णालया जवळ गाडी लावायला जागा शोधली आणि आम्ही रूम शोधू लागलो. कॉल्स करत होतो पण काही हॉटेल्स लांब होत्या, काहीं मध्ये पुरेश्या सुविधा नव्हत्या आणि ज्यात सुविधा होत्या त्या महागड्या होत्या. हवा तसा रूम मिळेना. तिथून आम्ही शिमलाच्या मॉल रोड जवळ जायचे ठरवले. टुरिस्ट डेस्टिनेशन असल्याने तिथे हॉटेल्स खूप होत्या ! अंधार वाढत होता म्हणून थेट जाऊनच रूम पाहू लागलो. शेवटी एक हॉटेल सापडली पण पार्किंगचे राव वांधेच ! रस्त्याला लागुन असल्याने जागा कमी होती.  त्याने जेमतेम कपडे बेगेत दाबून भरावे तसे हॉटेलच्या अंगणात दादर्या जवळच थोडी जागा केली आणि आम्ही गाड्या पार्क केल्या एकदाच्या! 

     हॉटेलच्या शोधात असल्याने जे बदललं होत आणि सांगायचं राहून गेलं ते म्हणजे मजेदार गुलाबी थंड हवा ! अस वाटत होतं जणु थंडी कुणी शिमल्यावर फेकून मारली होती ! शिमलाच पूर्ण एखाद्या फ्रिजच्या फ्रीझर सारख गाठलं होत. घरून आणलेले ग्लोझ फेल झाले होते. तोंडा शिवाय सगळं अंग गरम कपड्याने झाकण गरजेचं होतं अशी थंडी होती. ऐन हिवाळ्यात बर्फाने शिमला आच्छादीत असतं पण बर्फ शिमल्यात अजून पडला नव्हता. थंडीने मात्र कब्जा केला होता ! 

    रूम मध्ये फ्रेश होऊन मॉल रॉड वर फिरायला निघालो ! विदेशात पाय ठेवल्यागत आणि ती एकच तेवढी जागा आम्हाला सपाट दिसली होती. बाकी सारं शहर, सगळं दरी डोंगरावरच. सरकारी कचेऱ्या होत्या शॉपिंगची दुकान, हॉटेल्स, मेळ्या सारखी गर्दी होती. पर्यटक इथेच फेरफटका, शॉपिंग करायला आलेले दिसत होते. रात्री 8 वाजता आम्ही मॉल रॉड वर फिरत होतो. सेनेचे मोन्यूमेंट होते. आर्मीच्या कचेऱ्या ही होत्या पण तिकडे कुणाला प्रवेश नव्हता. आम्ही ग्लोझ, मफलर कानटोपी स्वेटर घेतले आणि तिथेच एका ढाब्या टाईप हॉटेल मध्ये जेवायला बसलो. आता इथे हिमाचली पद्धतीने बनवलेल पंजाबी जेवण होत. जेवण तिखट होत. थंडीत मध्ये तव्या वरुन उतरणारी गरमा गरम पोळी आणि  भाजी म्हणजे काय मज्जा ! गरमागरम पोटभर जेवलो.  आणि लांबसडक मॉलरोड वरुन फटाफट पाऊल टाकत होटेलला पोचलो आणि अंथरुणावर कोसळलो ! 




     थट्टा मस्करी आणि उद्याची प्लानिंग केली. एन हिवाळ्यात शिमल्यात कुणी बाईक ट्रीप करत नाही हे कळल.  ते उन्हाळ्यात लोक येतात. आणि आम्हालाही बुलेट घेऊन कुणी फिरायला आलेलं दिसलं नव्हत. तेव्हा हे धाडस अजाणता आम्ही केलं होतं हे आम्हाला कळलं.

         पुढच्या दिवशी सकाळी थंडी होती तीच होती. पुढे नारकंडा जायचा बेत होता. बर्फ अजून शिमल्यात शिरला नव्हता. सकाळी गरम पाण्याने शेक घेऊन चहा पाणी घेऊन आम्ही गाड्या काढल्या आणि नारकंडा जायला निघालो ! सामान गाडीला बांधला आणि हिमाचलच्या हायवे वर डोंगर दर्या थंडीची मज्जा घेत  आम्ही कुफ्रि पोचलो. रस्त्याने सफरचंदाची झाड लागलेली दिसली होती. ईथे मोठ्या प्रमाणात सफरचंदाची शेती होते. कुफ्रि हे शिमल्यातील प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे. बहुदा इथे बर्फ असतो. प्रवाशांचीही गर्दी होती. पण सर्वत्र हवा तसा बर्फ झाला नव्हता. कुफ्रिच्या डोंगराच्या शिखरांवर बर्फ होता. आम्ही गाडी थेट टेकडीच्या दिशेने टाकली आणि पायथ्याशी येऊन पोचलो. एक काका गोल भरतकाम केलेली लाल गोल हिमाचली टोपी घालुन नाश्त्याचा छोटा टेबल टाकुन बसलेले दिसले. स्टो काही भांडे आणि मॅगीचे पाकीटं होते. म्हटलं मॅगी खाऊन टेकडी चढुया.  तर 10ची मॅगी 50 रुपयाला होती. सहाजीक ईतक्या उंच भागावर सामान ने-आण करणं कठीन असल्याने महाग असणार. म्हटलं जीथे टुव्हिल लावायला जागा नाही तिथे मॅगी 50लाच मिळणार ! 


      मॅगी खाऊन घसरत्या रस्ताने टेकडीवर आम्ही चढत होतो.  झाडं झुडपांनी गच्च भरलेली टेकडी होती. रस्ता वगैरे नव्हता. उंचच उंच झाड होती.  पुढे शिखर गाठल.आणि काय दृष्य होत ! हिमालय दिसत होता. तोच पांढर शुभ्र साधू ! हजारो वर्षां पासून अचल, कुतूहल जागवणारा ! ज्याच्या कहाण्या ऐकल्या होत्या हॉलिवूडच्या फिल्म्स पाहील्या होत्या.

   थकवा जाणवत होता पण आसपासच दृश्य थकवा घालवणार होत. टेकडीवर फोटो काढून आम्ही नारकंडाच्या मार्गाला लागलो. नारकांडा हे शिमल्याहुन तिबेट कडे जाणार्या हाईवे नंबर पाच वर वसलेल सुंदर नगर आहे. आम्ही संध्याकाळच्या आसपास नारकंडा पोचलो. नारकांडा लहान टाऊन होते. लहान म्हणजे खूपच लहान. काही मोजके रोड सोडले की संपलं नारकंडा पण इथक्या प्राकृतिक सौंदर्या मुळे ते प्रसिद्ध होते. थंडीचा पारा आता घसरत होता ! आणि रूम मिळत नव्हत्या. हिवाळ्यात रूम मिळणं अवघड असत. थंडी मुळे इथले पाखरं लगेच घरट्यात शिरतात. जेमतेम काही हॉटेल शोधून एक टेकडीवर सापडलं. वजनदार बॅग्स खांद्यावर टाकून लाईट नसलेल्या अंधार्या रस्त्याने टेकडीवर असलेल्या हॉटेल मध्ये पोचलो. थंडीने शरीर गारठले होते. ही आमच्यासाठी अफाट थंडी होती. एवढ्यात रूम मालक येऊन सरप्राइझ देऊन गेला. बादलीत पाणी भरून घ्या कारण रात्री तापमान खाली गेल्याने नळात बर्फ होतो आणि पाणी येत नाही ! बापरे हे पहिल्यांदा एकल होत. लगेच आम्ही बादल्या भरून घेतल्या. गरम पाण्याने पाय शेकून जेवण करायला निघालो. कारण रेस्टोरंटही ईथे खुप उशीरा पर्यंत उघडी नसतात. तिथे नेगी रेस्टोरंट जुनं आणि प्रसिद्ध आहे पण गर्दी असल्याने जागा नव्हती म्हणुन त्याच्या समोरच एक हॉटेल उघडी होती तिथे आम्ही जेवण उरकुन घेतलं. तेवढ्यात नारकंडाचा रस्ता सुमसान झाला होता. ईथे रस्त्यावर मातीने माखलेला बर्फ होता ! चुकून पाय पडला आणि सटकला म्हणजे माणूस चालता चालता गरबडायचा. म्हणून काळजी पूर्वक हॉटेल पर्यंत पोचलो. थंडी असली तरी बर्फ पाहून बरं वाटलं होत. रूम मध्ये दार खिडल्या बंद केल्या. रात्रीचे 1 वाजले होते आणि टेम्प्रेचर पाहिलं तर माईनस 4 ! भयंकर थंडी होती ! मी शिंमल्यात घेतलेले नवे मोजे घालून घेतले आणि वरून पांघरुन घेऊन झोपून गेलो. हिटर तिथे उपलब्ध नव्हते. एक दुकानदार हिटर चालु करून दुकानात बसलेला पहिल्यांदा पहिला होता. नेहमी अस पहायची सवय नव्हती. आपल्य़ाकडे कुलर लावून बसलेले दुकानदार पाहिले होते पण इथे गरम हिटर जवळ घेऊन बसलेला माणुस दिसला होता. 


      रात्री तापमान माईनस 4 होते. सकाळी उठून गरमा गरम पाण्याने हातपाय तोंड धुतले. गरम पाण्याचा जग पायावर पडे तोच क्षण सुखाचा वाटे मग कडकडीत थंडी ! फ्रेश होऊन आम्ही तिथे प्रसिद्ध असलेल्या हाटु मंदिराच्या टेकडीच्या पायथ्याशी पोचलो. तिथुन पुढे तिबेटच्या दिशेने जाणाऱ्या हायवेय वर चहु दिशेला बर्फ होता. इतका की थेट गाडीचे टायर घसरत होते. दरीत बर्फ, बाजूला डोंगरावर बर्फ, आजूबाजूला सगळी कडे बर्फच बर्फ होता ! हे ही डोळ्यांना सवाईचे नव्हते ! चुकून जी गाडी 20 मिनिटात पुढे नेली गेली होती हे कळलं तेव्हा गाडी परत माघारी आणायला 1 तास लागला. कितीदा गाडी स्लिप होऊन सटकून पडत होती. शेवटी दरीत कोसळण्याची भीती होती म्हणुन गाडी वरून उतरून गाडीला ढकलत रस्त्यावर आणली.आणि आम्ही मागे वळलो. हाटु मंदिर हे इथले प्रसिद्ध स्थळ होते. पर्यटकांची बरीच गर्दी होती. हाटू देवीचे मंदिर टेकडीवर होते तीथे जायला वर पर्यंत रस्ता होता परंतु बर्फ पडला असल्याने तो त्या दिवशी बंद होता. पायीच वर जावं लागणार होत. इथे उंचीवर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला होता. साधी दोन पावलं घाईने टाकली तरी धापा लागत होत्या. चुकून कुणी पळाला तर तो 15 मिनिटं उठे ना ! वर जाणारे सगळे एक मेका कडे नजर गेली की ह्याच पंचायतीमुळे स्मित करत होते. उंचीवर ऑक्सिजन कमी असतो त्यामुळे थकवा लगेच लागतो. आम्ही चारही जण 30 मिनिटं चालून पार दमलो होतो. श्वास वाढत होता. रस्त्यात बर्फ होता काही वेळ तिथे घालवून आम्ही शिखरावर जाण्याचा विचार सोडला. हाटु मंदिर कठीण होते चढायला. आसपास पडलेल्या बर्फात लोक खेळत होती तिथेच काही विसावा घेऊन आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. आमच्या मधील तिघांनी हार मानली होती पण हर्ष नावाचा आमचा मित्र ऐकेना शेवटी तो मंदिरावर गेला खरा पण यायची पंचाईत होणार हे आम्हाला माहीत होते. आणि झालेही तेच श्वास घायला त्रास. म्हणजे हे राव 15 मिनिटं करत करत खाली येत येत संध्याकाळ केली. तोवर दोन-तीन मॅगी खाऊन झाल्या होत्या. किती तरी चहा झाला होता. संध्याकाळ व्हायला आली होती. आम्ही शेकोटी पेटवुन गप्पा करत त्याची वाट पहात बसलो होतो.

    इथून खरी परीक्षा सुरू होणार होती कारण वेळ नसल्याने  कालच्या माईनस 4 थंडी मध्ये चंदीगढला परत जायचे होते. पुन्हा पूर्ण कपडे चढवून बुलेट काढली आणि वाढत्या अंधारा सोबत आम्ही चंदीगढच्या मार्गाला लागलो. रस्ता रुंद आणि हायवे होता. नविन ग्लोझ घातले होते  पण हाताची बोट काही वेळेतच गारठुन जात मग बोटांची हालचाल केली की बर वाटे. साप सिडीच्या गेम सारखं पूर्ण गुंग होऊन सगळं भान फक्त गाडी चालवण्यावर कारण रस्ता सवयीचा नव्हता. आणि रात्र झाली होती. वारा गाार होता. मी कुठेही गाडी थांबवली नव्हती. बघता बघता 12 वाजले होते हायवे वर जेवण आटोपुन पुन्हा गाडी चालू. आता मात्र थंडीचा आनंद ऊब मागत होता. पांघरून मागत होता. तरी संध्याकाळ ते उशिरा रात्रीं पर्यंत आम्ही चंदिगढ शेवटी गाठलं. मध्ये मित्राच्या गाडीचा ब्रेक फेल व्हायचा मग परत यायचा पण रस्ता पाहुन अधिक गतीने जायचे नाही हे पक्के ठरवले होते त्यामुळे सकुशल आम्ही 12च्या सुमाराला चंदीगढला पोचलो. थकवा आणि थंडीने कुडकुडत होतो. आता मात्र रूम मध्ये शिरण्याची उत्कट इच्छा होती. अफाट थंडी होती. होटेल्स पुश्कळ होत्या परंतु चांगली होटल हवी होती. म्हणुन पुश्कळ वेळ चांगली हॉटेल बघण्यात गेला. रूम मिळताच गरम पाण्याचा मारा सुरू केला. गारठलेली बोट आणि पाय शेकुन बरे वाटले. आणि मनोमनी हिमालय ट्रेक करणाऱ्यांना महान विभूती म्हणून आठवत होतो. चित्रपटात वाटत तसं नसत. रात्री ईथली थंडी भयंकर होती. सतत थेट नारकंडा ते शिमला होत चंदीगढचा प्रवास झाला होता. ऑनलाइन जेवण मागवून अंथरुणात पडलो. 

     सकाळी पहाटे उठून ट्रेन होती म्हणून रघुविर बाईक रेन्टलला गाडी सोपविली आमचे आयडी कार्ड्स घेतले, गाडी दाखवली आणि लगेच रेल्वे स्टेशन गाठले. गाडी नुकतीच आली होती. गाडीत प्रवासाच्या गप्पा टप्पा करत अनुभवाच्या तरंगांवर स्वार होत शेवटी आम्ही सुरत गाठलं. किती तरी अव्यक्त अनुभव, शहरी जीवनात गुंचलेलो आपण आणि डोंगर दर्यात उमलणारं हे निसर्ग सौंदर्य. समजल. प्रवासाने माणुस अनुभव संमृद्ध होत असतो. 

     भारत सुंदर आहे विविधतेने नटलेला आहे , भारताचा भौगोलिक प्रदेश, लोक भाषा वेगळी असली तरी तिथली संस्कृती सुंदर आणि विविधतेत एकता असलेली आहे. हिमाचल मधली लोकं प्रवाशाचा सन्मान करतात आणि खुपच चांगली वागणुक देतात. शिस्तीच्या बाबतीत ते आग्रही आहेत. तरी आम्ही फक्त शिंमल्यात गेलो होतो ते सिक्कीम किव्वा अरुणाचल प्रदेश नव्हतं वा केरळ अथवा ओरिसा नव्हत. जग खूप मोठ्ठ आहे आणि भारतही विशाल भव्य दिव्य आहे. जागोजागी धर्म परंपरा, भूगोल, पहाड, जंगल काय प्रचंड अनुभव आहे भारत !