Sunday, September 5, 2021

शिक्षक दिन. न. प्रा. शि.समिती सुरत मराठी शाळा

शिक्षक दिन, न.प्रा.मराठी.शाळा.
    तीस पस्तीस वर्षा पूर्वीची गोष्ट नगर प्राथमिक शिक्षण समितीची अमाची शाळा नंबर 223. आता ती 264 झाली आहे. त्या शिवाय पण सुरत मध्ये अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळा सुरू होत्या. कुठे पक्की तर कुठे पत्र्याची मराठी शाळा चालू होती. मी शाळेत जाई पर्यंत आमची शाळा पक्की झाली होती, शाळेच्या बाहेर उंचच उंच झाड होती, मधली सूर्ट्टी झाली की सगळे जेवण घेऊन झाडाच्या सावलीत बसायची. खेळायची. इतकी मस्तीखोर पोर की आठवड्यात कुणाला ना कुणाला खेळताना मस्ती करताना लागायचं....मग शाळेतले शिक्षक फस्ट एडने मलम पट्टी करायचे. बहुतेक मुलांचे वाली कामाला जायचे. मुलांना सकाळी शाळेत सोडायचे, जेवणही शाळेत मिळत होत. दिवस निघत होते. 
     सकाळ झाली की शुक्रवारी पीटीचा तास व्हायचा, उभे हात, बैठे हात वगैरे झालं की मग सुरू व्हायची तपासणी, कुणाचे केस मोठे आहेत ? कोणी नख कापलेले नाहीत, कोण अंघोळ करून आलेलं नाही ? म्हणजे शुक्रवारी हे नेहमीच ह्या भीतीने अनेक पोर टापटीप होऊन यायची. पण जी काही पोर होती ती होती तशीच होती, त्याच्यावर शिक्षकांचे विशेष प्रेम होते. 
      मला आठवतं बहुतेक इयत्ता ४ मध्ये असताना आम्हाला एक शिक्षक होते, शाळा भरली की वर्गात सगळे आले की सुरुवात व्हायची एकेकाच्या तपासणीची, सर एकेकाला जवळ बोलवायचे आणि अंघोळ केलीय का नाही, तोंड धुतलंय का नाही, नख वगेरे तपासले जायचे. जो तोंड न धुता आला असेल त्याला हातात मंजन दिलं जायचं आणि त्याने मंजनने तोंड धून यायचं, ज्याचे नख मोठे असतील त्याला नेल कटर दिलं जायचं, जमत नसेल तर सर नख काढून द्यायचे. असा नित्य क्रम होता. त्या नंतर शिकवायला सुरुवात व्हायची. बहुतेक वाली कामाला जायचे त्यामुळे अनेक मूलभूत गोष्टींकडे शिक्षकांना लक्ष द्यावं लागायचं, आजच्या आधुनिक शाळा, स्मार्ट स्कूल वगेरे सुरू झाल्या आहेत. परंतु आजची जी पिढी उभी आहे त्यात या सर्व गुरुजनांचा मोठा वाटा आहे. जशी शाळा असेल तशी, ज्या काही मोजक्या सुविधा होत्या त्यांच्या सोबत अनेक विद्यार्थी घडले. आज बहुतेक ह्या शाळा स्मार्ट शाळा झाल्या आहेत. कॉम्प्युटर, बोर्ड लागले आहेत. नवीन पिढी पहील्या पिढी पेक्षा शिक्षणा विषयी सजाग झाली आहे. परंतु सुरुवातीच्या काळात सुरत मध्ये मराठी शाळा सुरू झाल्या तेव्हा विस्तारत जाऊन वालिंना समजावून मुला मुलींचे नाव शाळेत दाखल करणे, अनेक ठिकाणी विस्तारत जाऊन त्यांना शाळेत आणणे, थेट मंजन हातात देऊन वर्गाची सुरुवात, शाळेतील मध्यान्ह भोजन, दगडाची पाटी, शाळेतून मिळणारे पुस्तक या सगळ्यातून अनेक पिढ्या बाहेर पडल्या आणि स्थिरावल्या आहेत. या सुरुवातीच्या काळात ज्या शिक्षकांनी मूलभूत स्तरावर काम केलीत, सुरत मधील मराठी समाजातील विद्यार्थ्यांना उपलब्ध परिस्थिती मध्ये शिक्षण दिलं. आज जरी ते आजच्या हायफाय शाळां सारखं वाटतं नसेल तरी तो पाया होता, ती सुरुवात होती, त्याच्या वरच आजच्या पिढीच्या उच्च शिक्षणाची उभारणी झालेली आहे. अशा सुरत मधील मराठी शाळेच्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिना निमित्त मी वंदन करतो. रोजगार, कामा साठी सुरत मध्ये आलेल्या सर्व सामान्य मराठी माणसाच्या नवीन पिढीला त्यांनी शिक्षण दिलं. शिक्षणा पलीकडे जाऊन त्यांना मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या. आज या सर्व शिक्षकांना वंदन. सुरत मध्ये मराठी शिक्षणाच्या उंच इमारतींच्या पायथ्याशी याच शिक्षकांनी काम केलीत. भर घातली म्हणून आज मराठी शाळा आणि समाज पुढे जात आहे. दिवसेंदिवस विकासाच्या प्रवाहात जुळला आहे.