विचारांच्या परिघांचे सीमोल्लंघन
दसऱ्याच्या दिवशी परंपरागत रीतीने ग्रामीण भागात आलेल्या पहिल्या पिकाचा शेतकरी आनंदा साजरा करत असतो, त्या सोबतच शस्त्र पूजन, श्री रामाचे पुजन, रावण दहन, महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा देवीचे पूजन आणि सोने वाटून जेष्ठांचा आशीर्वाद घेत अनुजांना शुभेच्छा आशीर्वाद दिला जातो. अधर्मावर धर्माचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी. दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनाची देखील परंपरा आहे. गावच्या सीमेला ओलांडुन आल्यावर ओवाळणे, शमीच्या वृक्षाचे पूजन करणे, शस्त्राचे पूजन करणे अशा विविध रितेने एकाच दिवशी विविध काळात आणि युगात घडून आलेल्या प्रसंगांचा आज एक उत्सव म्हणजे दसऱ्याचा दिवस. परंतु या सोबतच वैचारिक कुंपणाचे सीमोल्लंघन हे आज सीमोल्लंघणाच्या उत्सवाला अधिक प्रासंगिक आणि व्यापक करते.
अज्ञानाच्या परिघाच्या पलीकडे सीमोल्लंघन, संकुचित बंदिस्त विचारांच्या पलीकडे मनाच्या पावलांनी केलेले सीमोल्लंघन आपल्या जाणिवा नेणिवा आणि अनुभव समृद्ध अधिक प्रगल्भ आणि प्रगत करत असते. हिंदू सनातन परंपरेचे प्रत्येक श्लोक, सुक्त, मंत्र, कथा हे कुठल्याही साधनेला प्रेरणा देणारे वैश्विक तत्वज्ञान आहे. ते जगातल्या समाजासाठी भौगोलिक रेषांच्या पलीकडे व्यक्तीच्या आत्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतात. वेद, गीता, रामायण, महाभारत आपल्याला ह्याच मानवीय विचारांच्या मर्यादेचे सिमोलंघन करण्याची प्रेरणा देतात.
भगवान कृष्ण, राम, महाभारतातील पात्र, वैदिक तत्वज्ञान, ह्या साऱ्या कथा पात्र आपले ठराविक साचेबंद विचारांच्या कुपणाला नेहमी धडक देत नाविन्यता आत्मसात करण्यास प्रेरणा देत असतात. या शिवाय वर्तमान परिस्थिती मध्ये ग्लोबलिझशनच्या काळात विकास आणि प्रगतीच्या दिशेने साऱ्या जगाने झेप घेतली आहे तेव्हा अनेक अज्ञात अपरिचित विषय, विचार, शिक्षण शाखा, यांच्या क्षेत्रात सीमोल्लंघन, मात्र भौतिक नव्हे तर वैचारिक जगताच्या क्षितिजांना ओलांडून नवीन क्षितिजांचे लंघन, नवीन संकल्पनांच्या विश्वात प्रवेश करणे आणि संकुचित, अप्रवाही, कालबाह्य झालेल्या किव्वा मर्यादित विचारांच्या पलीकडे नव्या विचारांच्या विश्वात सीमोल्लंघन करणे हे दसऱ्याला खऱ्या अर्थाने आपल्याला अधिक व्यापक, प्रगल्भ आणि प्रगतीच्या दिशेने प्रेरणा देणारे सीमोल्लंघन ठरते.
- मकरंद जोशी
No comments:
Post a Comment