मैत्री........
बालपणीच्या आठवणी आपण कधीच विसरत नाही... तसच एक नात चिरस्मरणीय असतं ते म्हणजे बालपणीची मैत्री ! लहानपणी नाकातून शेंबूड वाहणारा मित्र, टक्कल केलेला मित्र, कधी तरी गाऱ्यात भरलेला, पावसाळ्यात खळग्यात पडलेला मित्र, सर ज्याला नेहमी कुटायचे असा मित्र, हुशार मित्र, मित्रांची पंचाईत झाली की त्यावर हक्काने हसणारे मित्रच असतात परंतु पंचाईत झाल्या नंतर सर्वात आधी मदतीला धावणारे ही मित्रच असतात.
बालपणात जस जस आपण मोठं होत जातो तेव्हा आई, बाबा आणि परीवारा नंतर सर्वात आधी सामाजिक प्राणी बनण्याच्या पहील्या टप्प्यावर आपल्याला जो बाहेरचा व्यक्ती भेटतो तो असतो मित्र ! आपल्याला पाय फुटतात आणि घराबाहेर पाय पडायला लागले की प्रत्येक वेळेस घरा बाहेर ज्याच्या सोबत आपण खेळतो, आपल्या बालपणातले ते रम्य स्वप्न रंगवतो. कल्पनांच्या घोड्यावर स्वार होऊन गप्पा करतो. सोबत खोड्या करतो, खेळतो. कोवळ्या बाल वयातली एक निष्पाप अनोळखी सोबत हळू हळू घट्ट मैत्रीत बदलत जाते आणि आपण घरा बाहेर सामाजिक जीवनात पाहिलं नात बनवतो तो ते मैत्रीचं !
असे बालपणातले पाहिले वाहिले मित्र, प्राथमिक शिक्षण सोबत घेतलेले मित्र, आपल्या अंगणातले मित्र, नेहमी आठवतात, किव्वा त्या पहिल्या नात्याच्या आठवणी त्याच्या निष्पाप स्वरूपात नेहमी आपल्या स्मृतीत कोरल्या गेलेल्या असतात. जिवंत असतात. जग विश्वासावर चालत अस आपण अनेकदा मोठ्या, वयस्कर, अनुभवी लोकांना बोलतांना ऐकलेल आहे. मला वाटतं ज्या समाजाचा इतका मोठ्ठा पसारा ज्या परस्पर विश्वास ठेवण्याच्या वृत्तीवर चालतो त्यांचे बीज हे बालपणीच्या पहील्या वहिल्या, नवख्या मैत्रीच्या संबंधातूनच पेरल जात. बालपणी आपण घरा बाहेर सर्वात आधी विश्वास ठेवायला सुरुवात करतो तो मित्र असतो. हळूहळू अशा मित्रांची यादी वाढत जाते आणि जग सुंदर आहे, माणसे आपल्या सारखीच असतात असं मत आपल्यात रुजायला लागतं. समाजावर विश्वास ठेवण्याचं पाहिलं शिक्षणही बालपणाच्या मैत्रीतून आपण शिकत असतो. माणसं भोळी असतात, माणसं प्रेमळ असतात, मानस सहृदयी असतात. माणसं आपल्या सारखीच असतात हे मूल्य बालपणी नकळत आपल्या मैत्रीतून आपल्यात रुजत असत.
आयुष्याच्या वाटेवर पुढे जस जसे आपण मोठे होत जातो, जीवनाची व्यावहारिक अपरिहार्य वळण स्वीकारत मित्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. नेहमी भेटणं बंद होत, कधी काळी भेट होत असते पण तरी देखील आपल्यात जिवंत असलेल्या लहान बाळात तो मित्र, त्या आठवणी तितक्याच जिवंत, तितक्याच मजेदार असतात की जरी आपण अनेक वर्षांनी भेटलो तरी थेट २५ वर्ष मागे जाऊन घडलेल्या बालपणाच्या किस्स्यावर, आठवणींवर आपण त्याच निरागसतेने खळखळून हसत असतो. अगदी १०० रीचे मित्रही भेटले तरी बालपणाच्या निरागस आठवणींवर वयाच्या १०० व्या वर्षी देखील चेहऱ्यावर स्मित येतंच !
ह्या बलापणाच्या मित्रांशी पुढे नियमित भेट जरी होत नसली तरी एकमेकाच्या अंतःकरणात सगळेच एक लहानपण जिवंत ठेऊन असतात आणि त्या निष्पाप आठवणींच्या कप्प्यात जिवंत असते ती मैत्री जी पुढे आयुष्यात अनेक मित्र जोडत जाते आणि जग सुंदर आहे, माणसं आपल्या सारखीच असतात. जीवन सुंदर आहे. अशा अनेक भावनांनी जीवनावर विश्वास करायला शिकवते.
- मकरंद जोशी.
No comments:
Post a Comment