24 ऑगस्ट 2021 संत कवयित्री बहिणाबाई चौधरी जन्म जयंती निमित्त त्यांच्या प्रेरक काव्य विश्वाचा काहीसा आढावा.
जगण्याचा आत्मविश्वास आपल्याला येतो जेव्हा आपली मूळ आपल्याला ठाऊक असतात, आपला इतिहास, साहित्य, आपल्याला नेहमी प्रेरणा देत आपल्याला समृद्ध करत राहते. आपल्या मनाच्या गुफेत आत मध्ये एखाद्या ऊर्जेच्या लख्ख तेवत राहणाऱ्या प्रकाशा प्रमाणे हा ठेवा, आपल्यात अखंड धाडस, आत्मविश्वास, प्रेरणा पुरवत असतो, आज अशाच एका व्यक्तीमत्वाच्या जन्म जयंती निमित्त त्यांच्या विषयी वाचूया.
कवयित्री बहिणाबाई चौधरी आज समग्र महाराष्ट्राला संत कवयित्री म्हणून परिचित आहेत! उत्तर महाराष्ट्रतील जळगाव मधील असोदा येथे त्यांचा जन्म झाला, जीवन आणि व्यावहारिक शिक्षणाची समज, निसर्ग प्रकृती आणि कर्मयोगातून जाणीव झालेंल्या आध्यात्मिक शिकवणीचे प्रतिबिंब आणि जीवनाचे तत्वज्ञान आपणाला त्यांच्या साहित्यातून समजते, जगण्याचे तत्वज्ञान, आसपासच्या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण आणि त्याला प्रतिकात्मक लोक भाषेची जोड त्यांच्या कवितांना अधिक प्रभावी बनवितात, त्यांच्या कविता अधिक सहजतेने समजतात, त्यांचे औपचारिक शिक्षण झालेले नसले तरी त्यांची भावपूर्ण निरीक्षण क्षमता, बारीक निरीक्षण आणि अनुभवातून जन्मलेले जीवनाचे तत्वज्ञान, लोक भाषेची हातोटी आणि प्रतिकात्मक तीक्ष्ण अभिव्यक्तीने त्यांच्या कविता अर्थसमृद्ध झाल्या आहेत.
"अरे खोप्या मधी खोपा" ह्या कवितेत अत्यंत सूक्ष्म अर्थपूर्ण निरीक्षण आपणाला जाणवत, सुगरिणीने चोचीने पिल्लांसाठी बनविलेल्या घरट्याची गोष्ट त्यांनी मांडली आहेत ज्याच्या ओघात त्या,मातृत्व, निसर्ग जीवनाची प्रेरणा माणसाला शिकवुन जातात, त्यांची दुसरी प्रसिद्ध कविता " मन वढाय वढाय, उभ्या पिकतल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर," ही मनाच्या चिंतनातून उतरलेले, गूढ मनाच्या शोधा सोबत त्याचे निरीक्षण मांडते, सहज भाषेतील दृष्टांतांचा वापर अशा तत्व ज्ञानाच्या कठीण विषयाला सहज करून प्रस्तुत करते, या कवितेतून बहिणाबाईंनी मानवी मनाचे आकलन मांडले आहे, या शिवाय, बहिणाबाईंची अजरामर कविता "अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर" " माझी माय सरसोती", "माहेराची वाट", आली पंढरीची दिंडी", आला पह्यला पाऊस" अशा अनेक कविता आजही महाराष्ट्राच्या मनाला सहज सोप्या लोक भाषेत जीवनाचे गूढ तत्वज्ञान, आध्यात्म, निसर्ग प्रेरणा, सामाजिक निरीक्षणातुन कवितेच्या माध्यमातून शिकवण देत राहतात. आज त्यांच्या जन्म जयंती निमित्त प्रेरक स्मरण.
- मकरंद जोशी, सुरत
No comments:
Post a Comment