आपल्याला ठाऊक आहे का ? एशिया खंडात वेगवेगळ्या नावाने पूजलं जाणार आणि लोकप्रिय दैवत म्हणजे भगवान हनुमान यांचं जन्म स्थळ गुजरात मधील डांग जिल्ह्याच्या "अंजनिकुंड" ह्या गावात आलेलं आहे ! चला तर मग आज काही विशेष जाणून घेऊया भगवान हनुमान यांच्या डांग येथील जन्म स्थळा विषयी ! आपण सर्वांनी बालपणी बालाजी टेलिफिल्म्सची रामायण कथा दूरदर्शन वर पाहिलीच आहे किव्वा रामकथा ऐकली असेलच ! पण तुम्हाला एकूण आश्चर्य आणि आनंद होईल की हनुमान फक्त भारतातच नव्हे तर कंबोडिया, तिबेट, चीन,थायलंड, मलेशिया, बाली, जावा, सुमात्रा, व्हिएतनाम, लाओस आणि कोरिया मध्ये देखील अलौकिक देव म्हणून पुजले जातात आणि त्यांच्या लोककथा ह्या देशात प्रचलित आहेत ! हनुमंताची वेगवेगळी रूप ज्या त्या देशात वेगवेगळी बघायला मिळतात. चीन मध्ये हनुमंताच्या पात्राने प्रेरित "सन वुकाँग" ह्या अलौकिक वानर राजाची कथा प्रसिद्ध आहे. सन वुकाँग वर चीन मध्ये चित्रपट देखील झाला आहे. हल्लीच एक बातमी ऐकायला मिळाली होती की इराणच्या दरबंद इ बेलूला ह्या ठिकाणी एक 2000 bc चे भिंतीचित्र पाहण्यात आले जे भगवान श्री राम आणि हनुमान यांचे असण्याचा अंदाज आहे. ह्यावर अयोध्या शोध संस्थान संशोधन करत आहे. पर्शिया मधले पारसी आणि त्यांचे धार्मिक ग्रंथ झेंद अवेस्ता वाचल्यास वैदिक देवता आणि पारसी धर्म खूप जवळचा असल्याचे स्पष्ट कळते म्हणजे इराक मध्ये हिंदू देवतांचे भिंतीचित्र वा महादेवाची पिंड सापडणे शक्य आहे.
रामायणा विषयी आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल की एशिया उपखंडातील अनेक देशांची स्वतःची रामायण गाथा आहे. ती काहीशी भारतीय रामायणा पेक्षा वेगळी असली तरी प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मध्यवर्तीच कथा आहे. थायलंड मध्ये रामायणाला "रामकीन" कंबोडिया मध्ये "रिअमखेर" जावा बाली सुमात्रा मध्ये "काकावीन रामायण" फिलिपाईन्स मध्ये " महालडिया लावना" आणि लाओस मध्ये " फ्रा लक फ्रा रामा" या नावाने ओळखले जाते. रामायणाच्या कथा ह्या ददेशांत अत्यंत लोकप्रिय आहेत. आणि म्हणून या कथांच्या माध्यमाने भगवान हनुमान एशिया खंडात वेगवेगळ्या देशात नाटक, पुस्तक, कथा, लोककथा, लोकनाट्य, मंदिर, पुरातन लेख, शिल्प, मूर्ती भिंतीचित्र परंपरामूळे लोकप्रिय आणि पूज्य देवता ठरले आहेत.
भारतीय पुरातन संस्कृतीचे अंश फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या वेगवेगळ्या उपखंडात कमी जास्त प्रमाणात पहावयास मिळतात. त्याचे अनेक पुरातत्वीय साक्ष देखील आज अनेक देशात आहेत. प्राचीन मंदिर, देवालय, मुर्त्या,गुफा, भिंतीचित्र एशिया खंडात अनेक देशात बघायला मिळतात.
अशा या रामायणातील लोकप्रिय भगवान हनुमान यांच्या जन्म स्थळा विषयी अनेक मत आणि श्रद्धा आहेत. कर्नाटकच्या कप्पल जिल्ह्यात हम्पी जवळ अंजनाद्री पर्वतावर हनुमान यांचा जन्म झाला अशी तेथील स्थानिकांची श्रद्धा आहे तर दुसरी कडे झारखंड मधील गुमाला जिल्ह्यातील आंजन गावाच्या एका गुफेत त्यांचा जन्म झाला अशी लोक प्रसिद्धी आहे. या शिवाय हरियाणा येथे कैथल म्हणजे प्राचीन कपिस्थल येथे रुद्रावतार हनुमान यांचा जन्म झाला असेही काहींचे मत आहेत आणि स्थानिकांची तशी श्रद्धा आहे. त्याच प्रमाणे आंध्र प्रदेशातील 7 पर्वतांपैकी एक पर्वतावर पावनपुत्राचा जन्म झाला असे त्यांचे मत आहे.
तर चला आपण पुन्हा दक्षिण गुजरात मधील सुरत जिल्ह्या नजीक असलेल्या प्राकृतिक सौंदर्याने नटलेल्या सातपुडा आणि सह्याद्रीच्या पर्वत शृंखलांनी वैविध्यपूर्ण अशा डांग जिल्ह्यात आलेल्या " अंजनिकुंड" ह्या गावा विषयी माहिती घेऊया जिथे अंजनी पर्वतावर भगवान हनुमान यांचे जन्म स्थळ आहे.
त्रेता युगात भगवान श्री राम यांनी दंडकारण्यात वनवासाचे अनेक वर्षे काढले आणि डांग हा देखील दंडकरण्याच्या प्रदेशात येतो. दक्षिण आणि मध्य भारताच्या खाली विंध्याचल पर्वत रांगांच्या पलीकडे घनदाट जंगल असलेला दंडकारण्य ! डांग जिल्हा देखील दंडकारण्यात मोडला जाणारा प्रदेश असल्याने वनवासा दरम्यान श्री रामांनी येथे वास्तव्य केल्याचे म्हटले जाते आणि म्हणून श्री राम कालीन अनेक स्थळ ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. श्री रामाने माता शबरीची उष्टी बोर खाल्ली तो माता शबरीचा आश्रम देखील येथेच आला आहे. जे आज शबरीधाम म्हणून एक प्रसिद्ध धर्म स्थळ आहे !
चला तर मग सुरू करूया डांग मधील पवनपुत्र हनुमान जन्म स्थळ पुण्यभूमी "अंजनिकुंड"चा प्रवास ! मी माझे मित्र , निलेश परमार, कश्यप चौहाण आणि हर्ष देसाई अंजनिकुंड साठी सुरतेहून सकाळी 8 वाजता निघालो. सुरतहून 157 किलोमीटर अंतरावर बारडोलीहुन व्याराच्या मार्गाने वघई होत आहवा पर्यंत आम्ही दुपार पर्यंत पोचलो. आहवाहून 30 किलोमीटर अंतरावर डोंगरांचा घाट आणि नागमोडी रस्ता ओलांडत बोरखल पुढे लिंगागाव आहे इथून खाली 13 किलोमिटर अंतरावर डोंगरांच्या मध्यभागी डोळ्यांचे पारणे फेडणारे नयनरम्य अलौकिक भासणारे "अंजनिकुंड' गाव आहे. गावात शिरताच आजूबाजूला पाहिलं की सगळ्या दिशांना हिरवी गार डोंगर दिसता आणि गार वारा हिरवळ मानला शीतलता देत राहते ! गावाच्या मध्यभागी खडकांवर अंजनी देवीचे मंदिर आले आहे. इथून पुढे 1 किलो मीटर अंतरावर अंजनी डोंगराची गुफा आलेली आहे. ज्या गुफेत भगवान हनुमान यांचा जन्म झाला होता. आम्ही अंजनी डोंगराच्या दिशेने चालत निघालो काही वेळातच अंजनी डोंगराची विशाल आणि भव्य शिळा दिसू लागली. ह्या शीळेच्या खाली गुफा आहे हेच हनुमान जन्मस्थल म्हणून स्थानिकांत प्रचलित आहे. गुफेत हनुमंताची शिळा आली आहे. पावसाळ्यात ह्याच अंजनी डोंगराच्या विशाल शिळेवरून धबधबा कोसळतो. आणि पुढे हाच धबदबा गावातल्या अंजनी मदिरा जवळून वाहत गावात जातो. अंजनिकुंड गावात अशी कथा प्रसिद्ध आहे की देवी अंजनीने याच गुफेत भगवान शंकराची तपश्चर्या केली होती आणि प्रभू शिव प्रसन्न झाले होते. वरदान मागायला सांगितल्यास देवी अंजनीने आपणच माझ्या पोटी जन्म घ्यावा असे वरदान मागितले. व याच गावी रुद्र अवतार, बुद्धी, शौर्य, चातुर्य धैर्य, संकट मोचन भगवान हनुमान यांचा अंजनी डोंगराच्या गुफेत जन्म झाला.
वघईहून पूढे आहवा ते अंजनिकुंड पर्यंतचा मार्ग निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आहे. बाईकने जातांना रस्त्याच्या एका कडेला डोंगर दुसऱ्या बाजूला दरी आणि लांबच लांब पर्यंत पसरलेली हिरवळ मनाला शीतल स्पर्श करत आनंद देत राहते. उंच डोंगरांच्या दरीत 30 किलो मीटर आत शिरल्यावर जणूकाही वैदिक काळात किव्वा, पुस्तकात वाचालेल्या एखाद्या पौराणिक स्थळी आल्याचा अनुभव होतो इतके सुंदर अंजनिकुंड गाव आहे ! गावाच्या मध्यभागी देवी अंजनी मातेचे मंदिर आहे आणि चहू दिशेला उंच डोंगरांनी सुरक्षित आणि देवाने जणू सौंदर्याने नियोजनबद्ध गावाची रचना केली असावी असे वाटत राहते. डोंगरांच्या सर्व बाजूंच्या आतल्या उतारावर लहान लहान गवताची सुंदर मैदान, शेत दिसतात. पाण्याचा ओढा आणि खडकांचा मार्ग अधून मधून नागमोडा मार्ग लागत राहतो. इथेच सुरत मधील अडाजन येथील एका संस्थेने अंजनी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे .
मंदिरातून 1 किलोमीटर डोंगराच्या दिशेने एक रुंद चढणीचा मार्ग आहे तो थेट अंजनी गुफेकडे जातो, त्याच मार्गाने पुढे डोंगराच्या शिखरावर ही जाता येते. उंच भव्य शिळे खाली हनुमंताचे जन्म स्थळ आहे आणि मूर्तीची शिळा आहे. आम्ही गेलो तेव्हा गावातील बंधुजन आनंदी दिसत होते. गावातील मूल जवळ आली आणि त्यांनी अंजनी कुंड विषयी आम्हाला माहिती देखील दिली. मुलांच्या घोळक्यातून लखन आणि त्याची मित्र आम्हाला गुफेकडे घेऊन गेलीत. इथे पिण्यासाठी पाणी आणि कोरडा आहार उपलब्द्ध आहे. गावातील लोकांनी इथले सौंदर्य जपून ठेवले आहे. पावसाळ्यात इथले सौंदर्य स्वर्गा पेक्षा कमी नसेल असे तुम्हालाही वाटूत राहील. उन्हाळ्यात देखील डोंगराची शीतल सावली आणि वारा वाहात असतो. आजूबाजूची हिरवळ पाण्याचे कुंड, ओढे, खडक, डोंगर यांना प्रभू श्री राम आणि भगवान हनुमान यांच्या पवित्र वास्तव्याचा स्पर्श झाला असेल असे वाटत राहते. इतके सुंदर रमणीय आणि अलौकिक असे हे अंजनिकुंड गाव आहे !