Sunday, October 31, 2021

सुरतेच्या आरती वाडीलेने गुजरात मध्ये पटकाविला पहिला क्रमांक.

आरती मंसाराम वाडीले ह्या विद्यार्थिनीने " कण रगडीता तेल ही गळे " ह्या म्हणीला सार्थक केले आहे. सरकारी मूलभूत स्त्री अध्यापन मंदिर, सुरसागर, बडोदे येथील D.El. Ed (PTC) कॉलेजची तालिमार्थी "आरती मंसाराम वाडीले" हीने गुजरात राज्य परीक्षा बोर्ड द्वारा आताच  घोषित करण्यात आलेल्या द्वितीय वर्ष मराठी माध्यमाच्या निकाला मध्ये  संपुर्ण गुजरात राज्यात  85.13% मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ह्या विद्यार्थिनीने रात्र-दिवस खुप मेहनत करून ही सिद्धी मिळविली आहे. शाळावृंद आणि संपुर्ण समाजासाठी  खुपच गर्वची गोष्ट आहे.

"आरती मंसाराम वाडीले" ही मुलगी खुपच गरीब कुटुंबातुन येते. तिचे वडील "मंसाराम नामदेव वाडीले" भंगार विकण्याचे काम करतात. प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त दहा हजार  पर्यन्त कमवितात. तिची आई सुरेखा बाई एक कुशळ गृहिणी आहे. ह्या मुलीने खुपच परिश्रम करून संपुर्ण गुजरात राज्यात मराठी माध्यमाच्या PTC मध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. तसेच ती नगर प्राथमिक शिक्षण समिती संचालित श्री रणजित भाई देसाई शाळा नंबर-106,संजयनगर,लिंबायत,सुरत ची विद्यार्थिनी आहे. आरती ईतर गरीब आणि परिश्रमी विद्यार्थ्यांसाठी  प्रेरणारूप बनली आहे. संपुर्ण शाळा परिवार आणि समाज तिच्यासाठी गर्व अनुभवित आहे. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन पाठवीत आहे.

Tuesday, October 26, 2021

" दसरा" विचारांच्या परिघाचे सिमोलंघन - मकरंद जोशी

विचारांच्या परिघांचे सीमोल्लंघन 
    दसऱ्याच्या दिवशी परंपरागत रीतीने ग्रामीण भागात आलेल्या पहिल्या पिकाचा शेतकरी आनंदा साजरा करत असतो, त्या सोबतच शस्त्र पूजन, श्री रामाचे पुजन, रावण दहन, महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा देवीचे पूजन आणि सोने वाटून जेष्ठांचा आशीर्वाद घेत अनुजांना शुभेच्छा आशीर्वाद दिला जातो. अधर्मावर धर्माचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी. दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनाची देखील परंपरा आहे. गावच्या सीमेला ओलांडुन आल्यावर ओवाळणे, शमीच्या वृक्षाचे पूजन करणे, शस्त्राचे पूजन करणे अशा विविध रितेने एकाच दिवशी विविध काळात आणि युगात घडून आलेल्या प्रसंगांचा आज एक उत्सव म्हणजे दसऱ्याचा दिवस. परंतु या सोबतच वैचारिक कुंपणाचे सीमोल्लंघन हे आज सीमोल्लंघणाच्या उत्सवाला अधिक प्रासंगिक आणि व्यापक करते. 
अज्ञानाच्या परिघाच्या पलीकडे सीमोल्लंघन, संकुचित बंदिस्त विचारांच्या पलीकडे मनाच्या पावलांनी केलेले सीमोल्लंघन आपल्या जाणिवा नेणिवा आणि अनुभव समृद्ध अधिक प्रगल्भ आणि प्रगत करत असते. हिंदू सनातन परंपरेचे प्रत्येक श्लोक, सुक्त, मंत्र, कथा हे कुठल्याही साधनेला प्रेरणा देणारे वैश्विक तत्वज्ञान आहे. ते जगातल्या समाजासाठी भौगोलिक रेषांच्या पलीकडे व्यक्तीच्या आत्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतात. वेद, गीता, रामायण, महाभारत आपल्याला ह्याच मानवीय विचारांच्या मर्यादेचे सिमोलंघन करण्याची प्रेरणा देतात. 
भगवान कृष्ण, राम, महाभारतातील पात्र, वैदिक तत्वज्ञान, ह्या साऱ्या कथा पात्र आपले ठराविक साचेबंद विचारांच्या कुपणाला नेहमी धडक देत नाविन्यता आत्मसात करण्यास प्रेरणा देत असतात. या शिवाय वर्तमान परिस्थिती मध्ये  ग्लोबलिझशनच्या काळात विकास आणि प्रगतीच्या दिशेने साऱ्या जगाने झेप घेतली आहे तेव्हा अनेक अज्ञात अपरिचित विषय, विचार, शिक्षण शाखा, यांच्या क्षेत्रात सीमोल्लंघन, मात्र भौतिक नव्हे तर वैचारिक जगताच्या क्षितिजांना ओलांडून नवीन क्षितिजांचे लंघन, नवीन संकल्पनांच्या विश्वात प्रवेश करणे आणि संकुचित, अप्रवाही, कालबाह्य झालेल्या किव्वा मर्यादित विचारांच्या पलीकडे नव्या विचारांच्या विश्वात सीमोल्लंघन करणे हे दसऱ्याला खऱ्या अर्थाने आपल्याला अधिक व्यापक, प्रगल्भ आणि प्रगतीच्या दिशेने प्रेरणा देणारे सीमोल्लंघन ठरते. 
    - मकरंद जोशी

Sunday, September 5, 2021

शिक्षक दिन. न. प्रा. शि.समिती सुरत मराठी शाळा

शिक्षक दिन, न.प्रा.मराठी.शाळा.
    तीस पस्तीस वर्षा पूर्वीची गोष्ट नगर प्राथमिक शिक्षण समितीची अमाची शाळा नंबर 223. आता ती 264 झाली आहे. त्या शिवाय पण सुरत मध्ये अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळा सुरू होत्या. कुठे पक्की तर कुठे पत्र्याची मराठी शाळा चालू होती. मी शाळेत जाई पर्यंत आमची शाळा पक्की झाली होती, शाळेच्या बाहेर उंचच उंच झाड होती, मधली सूर्ट्टी झाली की सगळे जेवण घेऊन झाडाच्या सावलीत बसायची. खेळायची. इतकी मस्तीखोर पोर की आठवड्यात कुणाला ना कुणाला खेळताना मस्ती करताना लागायचं....मग शाळेतले शिक्षक फस्ट एडने मलम पट्टी करायचे. बहुतेक मुलांचे वाली कामाला जायचे. मुलांना सकाळी शाळेत सोडायचे, जेवणही शाळेत मिळत होत. दिवस निघत होते. 
     सकाळ झाली की शुक्रवारी पीटीचा तास व्हायचा, उभे हात, बैठे हात वगैरे झालं की मग सुरू व्हायची तपासणी, कुणाचे केस मोठे आहेत ? कोणी नख कापलेले नाहीत, कोण अंघोळ करून आलेलं नाही ? म्हणजे शुक्रवारी हे नेहमीच ह्या भीतीने अनेक पोर टापटीप होऊन यायची. पण जी काही पोर होती ती होती तशीच होती, त्याच्यावर शिक्षकांचे विशेष प्रेम होते. 
      मला आठवतं बहुतेक इयत्ता ४ मध्ये असताना आम्हाला एक शिक्षक होते, शाळा भरली की वर्गात सगळे आले की सुरुवात व्हायची एकेकाच्या तपासणीची, सर एकेकाला जवळ बोलवायचे आणि अंघोळ केलीय का नाही, तोंड धुतलंय का नाही, नख वगेरे तपासले जायचे. जो तोंड न धुता आला असेल त्याला हातात मंजन दिलं जायचं आणि त्याने मंजनने तोंड धून यायचं, ज्याचे नख मोठे असतील त्याला नेल कटर दिलं जायचं, जमत नसेल तर सर नख काढून द्यायचे. असा नित्य क्रम होता. त्या नंतर शिकवायला सुरुवात व्हायची. बहुतेक वाली कामाला जायचे त्यामुळे अनेक मूलभूत गोष्टींकडे शिक्षकांना लक्ष द्यावं लागायचं, आजच्या आधुनिक शाळा, स्मार्ट स्कूल वगेरे सुरू झाल्या आहेत. परंतु आजची जी पिढी उभी आहे त्यात या सर्व गुरुजनांचा मोठा वाटा आहे. जशी शाळा असेल तशी, ज्या काही मोजक्या सुविधा होत्या त्यांच्या सोबत अनेक विद्यार्थी घडले. आज बहुतेक ह्या शाळा स्मार्ट शाळा झाल्या आहेत. कॉम्प्युटर, बोर्ड लागले आहेत. नवीन पिढी पहील्या पिढी पेक्षा शिक्षणा विषयी सजाग झाली आहे. परंतु सुरुवातीच्या काळात सुरत मध्ये मराठी शाळा सुरू झाल्या तेव्हा विस्तारत जाऊन वालिंना समजावून मुला मुलींचे नाव शाळेत दाखल करणे, अनेक ठिकाणी विस्तारत जाऊन त्यांना शाळेत आणणे, थेट मंजन हातात देऊन वर्गाची सुरुवात, शाळेतील मध्यान्ह भोजन, दगडाची पाटी, शाळेतून मिळणारे पुस्तक या सगळ्यातून अनेक पिढ्या बाहेर पडल्या आणि स्थिरावल्या आहेत. या सुरुवातीच्या काळात ज्या शिक्षकांनी मूलभूत स्तरावर काम केलीत, सुरत मधील मराठी समाजातील विद्यार्थ्यांना उपलब्ध परिस्थिती मध्ये शिक्षण दिलं. आज जरी ते आजच्या हायफाय शाळां सारखं वाटतं नसेल तरी तो पाया होता, ती सुरुवात होती, त्याच्या वरच आजच्या पिढीच्या उच्च शिक्षणाची उभारणी झालेली आहे. अशा सुरत मधील मराठी शाळेच्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिना निमित्त मी वंदन करतो. रोजगार, कामा साठी सुरत मध्ये आलेल्या सर्व सामान्य मराठी माणसाच्या नवीन पिढीला त्यांनी शिक्षण दिलं. शिक्षणा पलीकडे जाऊन त्यांना मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या. आज या सर्व शिक्षकांना वंदन. सुरत मध्ये मराठी शिक्षणाच्या उंच इमारतींच्या पायथ्याशी याच शिक्षकांनी काम केलीत. भर घातली म्हणून आज मराठी शाळा आणि समाज पुढे जात आहे. दिवसेंदिवस विकासाच्या प्रवाहात जुळला आहे.

Monday, August 23, 2021

संत कवयित्री बहीणाबाई चौधरी, जगण्यातून जन्मलेल तत्वज्ञान - मकरंद जोशी

24 ऑगस्ट 2021 संत कवयित्री बहिणाबाई चौधरी जन्म जयंती निमित्त त्यांच्या प्रेरक काव्य विश्वाचा काहीसा आढावा.
     जगण्याचा आत्मविश्वास आपल्याला येतो जेव्हा आपली मूळ आपल्याला ठाऊक असतात, आपला इतिहास, साहित्य,  आपल्याला नेहमी प्रेरणा देत आपल्याला समृद्ध करत राहते.  आपल्या मनाच्या गुफेत आत मध्ये एखाद्या ऊर्जेच्या लख्ख तेवत राहणाऱ्या प्रकाशा प्रमाणे हा ठेवा, आपल्यात अखंड धाडस, आत्मविश्वास, प्रेरणा पुरवत असतो, आज अशाच एका व्यक्तीमत्वाच्या जन्म जयंती निमित्त त्यांच्या विषयी वाचूया.
 
         कवयित्री बहिणाबाई चौधरी आज समग्र महाराष्ट्राला संत कवयित्री म्हणून परिचित आहेत! उत्तर महाराष्ट्रतील जळगाव मधील असोदा येथे त्यांचा जन्म झाला,  जीवन आणि व्यावहारिक शिक्षणाची समज, निसर्ग प्रकृती आणि कर्मयोगातून जाणीव झालेंल्या आध्यात्मिक शिकवणीचे प्रतिबिंब आणि जीवनाचे तत्वज्ञान आपणाला त्यांच्या साहित्यातून समजते, जगण्याचे तत्वज्ञान, आसपासच्या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण आणि त्याला प्रतिकात्मक लोक भाषेची जोड  त्यांच्या कवितांना अधिक प्रभावी बनवितात, त्यांच्या  कविता अधिक सहजतेने समजतात, त्यांचे औपचारिक शिक्षण झालेले नसले तरी त्यांची भावपूर्ण निरीक्षण क्षमता, बारीक निरीक्षण आणि अनुभवातून जन्मलेले जीवनाचे तत्वज्ञान, लोक भाषेची हातोटी आणि प्रतिकात्मक तीक्ष्ण अभिव्यक्तीने त्यांच्या कविता अर्थसमृद्ध झाल्या आहेत.
 "अरे खोप्या मधी खोपा"  ह्या कवितेत अत्यंत सूक्ष्म अर्थपूर्ण  निरीक्षण आपणाला जाणवत, सुगरिणीने चोचीने पिल्लांसाठी बनविलेल्या घरट्याची गोष्ट त्यांनी मांडली आहेत ज्याच्या ओघात त्या,मातृत्व, निसर्ग जीवनाची प्रेरणा माणसाला शिकवुन जातात, त्यांची दुसरी प्रसिद्ध कविता " मन वढाय वढाय, उभ्या पिकतल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर,"  ही मनाच्या चिंतनातून उतरलेले, गूढ मनाच्या शोधा सोबत त्याचे निरीक्षण मांडते, सहज भाषेतील दृष्टांतांचा वापर अशा तत्व ज्ञानाच्या कठीण  विषयाला सहज करून प्रस्तुत करते, या कवितेतून बहिणाबाईंनी मानवी मनाचे आकलन मांडले आहे, या शिवाय, बहिणाबाईंची अजरामर कविता "अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर" " माझी माय सरसोती", "माहेराची वाट", आली पंढरीची दिंडी", आला पह्यला पाऊस" अशा अनेक कविता आजही महाराष्ट्राच्या मनाला सहज सोप्या लोक भाषेत जीवनाचे गूढ तत्वज्ञान, आध्यात्म, निसर्ग प्रेरणा, सामाजिक निरीक्षणातुन कवितेच्या माध्यमातून शिकवण देत राहतात. आज त्यांच्या जन्म जयंती निमित्त प्रेरक स्मरण. 
- मकरंद जोशी, सुरत

मैत्री...., बालपणी सामाजिक जीवन सुरू होण्याचा पहिला, रंजक, अविस्मरणीय अनुभव.

मैत्री........
              बालपणीच्या आठवणी आपण कधीच विसरत नाही... तसच एक नात चिरस्मरणीय असतं ते म्हणजे बालपणीची मैत्री ! लहानपणी नाकातून शेंबूड वाहणारा मित्र, टक्कल केलेला मित्र, कधी तरी गाऱ्यात भरलेला, पावसाळ्यात खळग्यात पडलेला मित्र, सर ज्याला नेहमी कुटायचे असा मित्र, हुशार मित्र, मित्रांची पंचाईत झाली की त्यावर हक्काने हसणारे मित्रच असतात परंतु पंचाईत झाल्या नंतर सर्वात आधी मदतीला धावणारे ही मित्रच असतात. 
       

            बालपणात जस जस आपण मोठं होत जातो तेव्हा आई, बाबा आणि परीवारा नंतर सर्वात आधी सामाजिक प्राणी बनण्याच्या पहील्या टप्प्यावर आपल्याला जो बाहेरचा व्यक्ती भेटतो तो असतो मित्र ! आपल्याला पाय फुटतात आणि घराबाहेर पाय पडायला लागले की प्रत्येक वेळेस घरा बाहेर ज्याच्या सोबत आपण खेळतो, आपल्या बालपणातले ते रम्य स्वप्न रंगवतो. कल्पनांच्या घोड्यावर स्वार होऊन गप्पा करतो. सोबत खोड्या करतो, खेळतो. कोवळ्या बाल वयातली एक निष्पाप अनोळखी सोबत हळू हळू घट्ट मैत्रीत बदलत जाते आणि आपण घरा बाहेर सामाजिक जीवनात पाहिलं नात बनवतो तो ते मैत्रीचं !  
            असे बालपणातले पाहिले वाहिले मित्र, प्राथमिक शिक्षण सोबत घेतलेले मित्र, आपल्या अंगणातले मित्र, नेहमी आठवतात, किव्वा त्या पहिल्या नात्याच्या आठवणी त्याच्या निष्पाप स्वरूपात नेहमी आपल्या स्मृतीत कोरल्या गेलेल्या असतात. जिवंत असतात.  जग विश्वासावर चालत अस आपण अनेकदा मोठ्या, वयस्कर, अनुभवी लोकांना बोलतांना ऐकलेल आहे. मला वाटतं ज्या समाजाचा इतका मोठ्ठा पसारा ज्या परस्पर विश्वास ठेवण्याच्या वृत्तीवर चालतो त्यांचे बीज हे बालपणीच्या पहील्या वहिल्या, नवख्या मैत्रीच्या संबंधातूनच पेरल जात. बालपणी आपण घरा बाहेर सर्वात आधी विश्वास ठेवायला सुरुवात करतो तो मित्र असतो. हळूहळू अशा मित्रांची यादी वाढत जाते आणि जग सुंदर आहे, माणसे आपल्या सारखीच असतात असं मत आपल्यात रुजायला लागतं.  समाजावर विश्वास ठेवण्याचं पाहिलं शिक्षणही बालपणाच्या मैत्रीतून आपण शिकत असतो. माणसं भोळी असतात, माणसं प्रेमळ असतात, मानस सहृदयी असतात. माणसं आपल्या सारखीच असतात हे मूल्य बालपणी नकळत आपल्या मैत्रीतून आपल्यात रुजत असत.
            आयुष्याच्या वाटेवर पुढे जस जसे आपण मोठे होत जातो, जीवनाची व्यावहारिक अपरिहार्य वळण स्वीकारत मित्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. नेहमी भेटणं बंद होत, कधी काळी भेट होत असते पण तरी देखील आपल्यात जिवंत असलेल्या लहान बाळात तो मित्र, त्या आठवणी तितक्याच जिवंत, तितक्याच मजेदार असतात की जरी आपण अनेक वर्षांनी भेटलो तरी थेट २५ वर्ष मागे जाऊन घडलेल्या बालपणाच्या किस्स्यावर, आठवणींवर आपण त्याच निरागसतेने खळखळून हसत असतो. अगदी १०० रीचे मित्रही भेटले तरी बालपणाच्या निरागस आठवणींवर वयाच्या १०० व्या वर्षी देखील चेहऱ्यावर स्मित येतंच ! 
          ह्या बलापणाच्या मित्रांशी पुढे नियमित भेट जरी होत नसली तरी एकमेकाच्या अंतःकरणात सगळेच एक लहानपण जिवंत ठेऊन असतात आणि त्या निष्पाप आठवणींच्या कप्प्यात जिवंत असते ती मैत्री जी पुढे आयुष्यात अनेक मित्र जोडत जाते आणि जग सुंदर आहे, माणसं आपल्या सारखीच असतात. जीवन सुंदर आहे. अशा अनेक भावनांनी जीवनावर विश्वास करायला शिकवते.
- मकरंद जोशी.

Friday, August 13, 2021

अवयवदान अभियानाचे संस्मरण. "माझी लिव्हर ट्रान्सप्लांट यात्रा - थर्ड इनिंग" - आदरणीय श्री दीलीपभाई देशमुख दादा

आज " वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे" म्हणजेच "जागतिक अवयवदान दिन - 2021" अवयवदान केल्याने ज्यांची अवयव निष्क्रीय झालेली आहेत त्यांना अंग प्रत्यारोपणाद्वारे नवजीवन मिळते. जीवन जगण्याची नवीन संधी मिळते.    





 सुरत येथे स्व. महर्ष पटेल यांचा आकस्मिक मृत्यु झाला. त्यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषीत केले. त्या नंतर त्याच्या परिवाराने अवयवदानाची मंजुरी दीली आणि चार व्यक्तिंना स्व. महर्ष पटेल याच्यां अंगांचे प्रत्यारोपण करण्यात आले. स्व. महर्ष पटेल यांच्या पहिल्या पुण्यतिथि निमित्त जुलै 2021 मध्ये "महर्ष सामावलेत महर्षीत" या त्यांच्या परिवाराचा  ऋणस्विकार कार्यक्रम करण्यात आला. आणि दादांच्या "माझी लिव्हर ट्रान्सप्लांट यात्रा- थर्ड इनिंग" पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.


 बालपणा पासून समाज सेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पीत केलेले आदरणीय दादा म्हणजे श्री दिलीप भाई देशमुख यांना स्व. महर्ष पटेल यांच्या लिव्हर प्रत्यारोपणामुळे नवीन आयुष्य लाभले. दादांनी त्यांच्या आयुष्याच्या दोघी इनिंग समाज कार्यासाठी वाहून नेल्या होत्या आणि तिसऱ्या इनिंगच्या काळात ते समाजकार्यात व्यस्त असतांना  लिव्हरच्या आजाराच्या असहाय्य पिडेत सापडले परंतु  दृढ मनोबळ आणि अगाध आत्मबळाच्या जोरावर दीर्घकाळ पीडादायक प्रतिक्षा काळ पुर्ण करुन लिव्हर प्रत्यारोपणाच्या कठीण प्रक्रियेतून स्वस्थ बाहेर पडले आणि उर्वरित आयुष्याची तिसरी इनिंग अवयवदान या महादानाच्या प्रचार अभियानासाठी वाहून नेण्यास सुरुवात केली. 


 दादांनी अवयवदानाच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांचा अनुभव " माझी लिव्हर ट्रान्सप्लांट यात्रा - थर्ड इनिंग" या पुस्तकात अंकित केला आहे. याची प्रथम आवृत्ती सुरत येथे प्रकाशीत करण्यात आली होती व त्याची दुसरी आवृत्ति देखील प्रकाशीत झाली आहे.  हल्ली दादांनी गुजरातभर वेगवेगळ्या शहरात अवयवदानाचे प्रचार अभियान चालवले आहे.  अवयवदाना विषयी समाजात जागृती आणण्यासाठी विविध कार्यक्रम सुरु केलेत, विविध संस्था, डॉक्टर्स, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, विद्यार्थी, त्याच्याशी जुळलेली लोकं यांच्या व्यक्तिगत आणि सामुहीक भेटीगाठी करून, सतत प्रवास करून  सोशल मीडिया आणि इतर मध्यामांद्वारे अवयवदानाच्या प्रचार प्रसारात आयुष्याची तिसरी इनिंग समर्पीत केली आहे. आज जागतिक अवयवदान दिना निमित्त त्याच्या या अविरत समाज सेवेच्या कार्याचे प्रेरक स्मरण व  स्वास्थ आयुष्याची मंगल कामना. 


    स्व. महर्षभाई पटेल तसेच प्रसंगी अंगदान करणारे आणि समाजासाठी आपले संपुर्ण आयुष्य समर्पीत करुन आयुष्याच्या उत्तरार्ध देखील अवयवदानाचे अभियान उभे करणारे ऋषीतुल्य आदरणीय श्री दीलीपभाई देशमुख दादा यांना वंदन.  


       परिवारातील प्रिय व्यक्तीच्या एकाएकी घडलेल्या मृत्यूने परिवारावर दुःखाचं आभाळ कोसळलेलं असतं. शोक आणि दुःखाने तुडुंब भरलेलं मन असतानाही त्याच प्रिय व्यक्तीच्या अवयवदानाने दुसऱ्या कुणाच्या आयुष्यात जगण्याचा प्रकाश आपण पेरू शकतो, कुणाला जगण्याची संधी देऊ शकतो ह्या मानवीय ओलाव्यातून अंकुरित झालेल्या अवयवदानाच्या महादानाने अनेक लोकांना जगण्याची नवीन संधी मिळाली आहे. एखाद्या अंगदानाने आपल्या परिवारातील व्यक्तीला नवीन आयुष्य लाभेल या प्रतीक्षेत तळमळत बसलेल्या समाजातील आपल्या पैकीच कुणाच्या बाळाला, आईला, वडिलांना, मुलाला, पत्नीला, आजोबांना नवीन आयुष्य लाभेल याची प्रार्थना असते. 
 ऋषीतुल्य आदरणीय श्री दीलीपभाई देशमुख दादा


                    सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ।। अर्थ : सर्वानी सुखी व्हावे, सर्वांनी रोगमुक्त रहावे, सर्वांनी मंगलमय घटनांचे साक्षी व्हावे आणि कुणालाही दु:ख मिळू नये. 

Thursday, July 15, 2021

सुरतकरांनो तुम्हाला ठाऊक आहे का ? भगवान हनुमान यांचे जन्मस्थळ "अंजनिकुंड" हे डांग जिल्ह्यात आहे !

आपल्याला ठाऊक आहे का ? एशिया खंडात वेगवेगळ्या नावाने पूजलं जाणार आणि लोकप्रिय दैवत म्हणजे भगवान हनुमान यांचं जन्म स्थळ गुजरात मधील डांग जिल्ह्याच्या "अंजनिकुंड" ह्या गावात आलेलं आहे ! चला तर मग आज काही विशेष जाणून घेऊया भगवान हनुमान यांच्या डांग येथील जन्म स्थळा विषयी !  आपण सर्वांनी बालपणी बालाजी टेलिफिल्म्सची रामायण कथा दूरदर्शन वर पाहिलीच आहे किव्वा रामकथा ऐकली असेलच ! पण तुम्हाला एकूण आश्चर्य आणि आनंद होईल की हनुमान फक्त भारतातच नव्हे तर कंबोडिया, तिबेट, चीन,थायलंड, मलेशिया, बाली, जावा, सुमात्रा, व्हिएतनाम, लाओस आणि कोरिया मध्ये देखील अलौकिक देव म्हणून पुजले जातात आणि त्यांच्या लोककथा ह्या देशात प्रचलित आहेत ! हनुमंताची वेगवेगळी रूप ज्या त्या देशात वेगवेगळी बघायला मिळतात. चीन मध्ये हनुमंताच्या पात्राने प्रेरित "सन वुकाँग" ह्या अलौकिक वानर राजाची कथा प्रसिद्ध आहे. सन वुकाँग वर चीन मध्ये चित्रपट देखील झाला आहे. हल्लीच एक बातमी ऐकायला मिळाली होती की इराणच्या दरबंद इ बेलूला ह्या ठिकाणी एक 2000 bc चे भिंतीचित्र पाहण्यात आले जे भगवान श्री राम आणि हनुमान यांचे असण्याचा अंदाज आहे. ह्यावर अयोध्या शोध संस्थान संशोधन करत आहे. पर्शिया मधले पारसी आणि त्यांचे धार्मिक ग्रंथ झेंद अवेस्ता वाचल्यास वैदिक देवता आणि पारसी धर्म खूप जवळचा असल्याचे स्पष्ट कळते म्हणजे इराक मध्ये हिंदू देवतांचे भिंतीचित्र वा महादेवाची पिंड सापडणे शक्य आहे. 
    रामायणा विषयी आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल की एशिया उपखंडातील अनेक देशांची स्वतःची रामायण गाथा आहे. ती काहीशी भारतीय रामायणा पेक्षा वेगळी असली तरी प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मध्यवर्तीच कथा आहे. थायलंड मध्ये रामायणाला "रामकीन" कंबोडिया मध्ये "रिअमखेर" जावा बाली सुमात्रा मध्ये "काकावीन रामायण" फिलिपाईन्स मध्ये " महालडिया लावना" आणि लाओस मध्ये " फ्रा लक फ्रा रामा" या नावाने ओळखले जाते. रामायणाच्या कथा ह्या ददेशांत अत्यंत लोकप्रिय आहेत. आणि म्हणून या कथांच्या माध्यमाने भगवान हनुमान एशिया खंडात वेगवेगळ्या देशात नाटक, पुस्तक, कथा, लोककथा, लोकनाट्य, मंदिर, पुरातन लेख, शिल्प, मूर्ती भिंतीचित्र परंपरामूळे  लोकप्रिय आणि पूज्य देवता ठरले आहेत. 
        भारतीय पुरातन संस्कृतीचे अंश फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या वेगवेगळ्या उपखंडात कमी जास्त प्रमाणात पहावयास मिळतात. त्याचे अनेक पुरातत्वीय साक्ष देखील आज अनेक देशात आहेत. प्राचीन मंदिर, देवालय, मुर्त्या,गुफा, भिंतीचित्र एशिया खंडात अनेक देशात बघायला मिळतात. 
       अशा या रामायणातील लोकप्रिय भगवान हनुमान यांच्या जन्म स्थळा विषयी अनेक मत आणि श्रद्धा आहेत. कर्नाटकच्या कप्पल जिल्ह्यात हम्पी जवळ अंजनाद्री पर्वतावर हनुमान यांचा जन्म झाला अशी तेथील स्थानिकांची श्रद्धा आहे तर दुसरी कडे झारखंड मधील गुमाला जिल्ह्यातील आंजन गावाच्या एका गुफेत त्यांचा जन्म झाला अशी लोक प्रसिद्धी आहे. या शिवाय हरियाणा येथे कैथल म्हणजे प्राचीन कपिस्थल येथे रुद्रावतार हनुमान यांचा जन्म झाला असेही काहींचे मत आहेत आणि स्थानिकांची तशी श्रद्धा आहे. त्याच प्रमाणे आंध्र प्रदेशातील 7 पर्वतांपैकी एक पर्वतावर पावनपुत्राचा जन्म झाला असे त्यांचे मत आहे. 
         तर चला आपण पुन्हा दक्षिण गुजरात मधील सुरत जिल्ह्या नजीक असलेल्या प्राकृतिक सौंदर्याने नटलेल्या सातपुडा आणि सह्याद्रीच्या पर्वत शृंखलांनी वैविध्यपूर्ण अशा डांग जिल्ह्यात आलेल्या " अंजनिकुंड" ह्या गावा विषयी माहिती घेऊया जिथे अंजनी पर्वतावर भगवान हनुमान यांचे जन्म स्थळ आहे. 
      त्रेता युगात भगवान श्री राम यांनी दंडकारण्यात वनवासाचे अनेक वर्षे काढले आणि डांग हा देखील दंडकरण्याच्या प्रदेशात येतो. दक्षिण आणि मध्य भारताच्या खाली विंध्याचल पर्वत रांगांच्या पलीकडे घनदाट जंगल असलेला दंडकारण्य ! डांग जिल्हा देखील दंडकारण्यात मोडला जाणारा प्रदेश असल्याने वनवासा दरम्यान श्री रामांनी येथे वास्तव्य केल्याचे म्हटले जाते आणि म्हणून श्री राम कालीन अनेक स्थळ ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. श्री रामाने माता शबरीची उष्टी बोर खाल्ली तो माता शबरीचा आश्रम देखील येथेच आला आहे. जे आज शबरीधाम म्हणून एक प्रसिद्ध धर्म स्थळ आहे !    
         चला तर मग सुरू करूया डांग मधील पवनपुत्र हनुमान जन्म स्थळ पुण्यभूमी "अंजनिकुंड"चा प्रवास ! मी माझे मित्र , निलेश परमार, कश्यप चौहाण आणि हर्ष देसाई अंजनिकुंड साठी सुरतेहून सकाळी 8 वाजता निघालो. सुरतहून 157 किलोमीटर अंतरावर बारडोलीहुन व्याराच्या मार्गाने वघई होत आहवा पर्यंत आम्ही दुपार पर्यंत पोचलो. आहवाहून 30 किलोमीटर अंतरावर डोंगरांचा घाट आणि नागमोडी रस्ता ओलांडत बोरखल पुढे लिंगागाव आहे इथून खाली 13 किलोमिटर अंतरावर डोंगरांच्या मध्यभागी डोळ्यांचे पारणे फेडणारे नयनरम्य अलौकिक भासणारे "अंजनिकुंड' गाव आहे.  गावात शिरताच आजूबाजूला पाहिलं की सगळ्या दिशांना हिरवी गार डोंगर दिसता आणि गार वारा हिरवळ मानला शीतलता देत राहते ! गावाच्या मध्यभागी खडकांवर अंजनी देवीचे मंदिर आले आहे. इथून पुढे 1 किलो मीटर अंतरावर अंजनी डोंगराची गुफा आलेली आहे. ज्या गुफेत भगवान हनुमान यांचा जन्म झाला होता. आम्ही अंजनी डोंगराच्या दिशेने चालत निघालो काही वेळातच अंजनी डोंगराची विशाल आणि भव्य शिळा दिसू लागली. ह्या शीळेच्या खाली गुफा आहे हेच हनुमान जन्मस्थल म्हणून स्थानिकांत प्रचलित आहे. गुफेत हनुमंताची शिळा आली आहे. पावसाळ्यात ह्याच अंजनी डोंगराच्या विशाल शिळेवरून धबधबा कोसळतो. आणि पुढे हाच धबदबा गावातल्या अंजनी मदिरा जवळून वाहत गावात जातो. अंजनिकुंड गावात अशी कथा प्रसिद्ध आहे की देवी अंजनीने याच गुफेत भगवान शंकराची तपश्चर्या केली होती आणि प्रभू शिव प्रसन्न झाले होते. वरदान मागायला सांगितल्यास देवी अंजनीने आपणच माझ्या पोटी जन्म घ्यावा असे वरदान मागितले. व याच गावी रुद्र अवतार, बुद्धी, शौर्य, चातुर्य धैर्य, संकट मोचन भगवान हनुमान यांचा अंजनी डोंगराच्या गुफेत जन्म झाला. 
         वघईहून पूढे आहवा ते अंजनिकुंड पर्यंतचा मार्ग निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आहे. बाईकने जातांना रस्त्याच्या एका कडेला डोंगर दुसऱ्या बाजूला दरी आणि लांबच लांब पर्यंत पसरलेली हिरवळ मनाला शीतल स्पर्श करत आनंद देत राहते. उंच डोंगरांच्या दरीत 30 किलो मीटर आत शिरल्यावर जणूकाही वैदिक काळात किव्वा, पुस्तकात वाचालेल्या एखाद्या पौराणिक स्थळी आल्याचा अनुभव होतो इतके सुंदर अंजनिकुंड गाव आहे !  गावाच्या मध्यभागी देवी अंजनी मातेचे मंदिर आहे आणि चहू दिशेला उंच डोंगरांनी सुरक्षित आणि देवाने जणू सौंदर्याने नियोजनबद्ध गावाची रचना केली असावी असे वाटत राहते. डोंगरांच्या सर्व बाजूंच्या आतल्या उतारावर लहान लहान गवताची सुंदर मैदान, शेत दिसतात. पाण्याचा ओढा आणि खडकांचा मार्ग अधून मधून नागमोडा मार्ग लागत राहतो. इथेच सुरत मधील अडाजन येथील एका संस्थेने अंजनी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे .
 मंदिरातून 1 किलोमीटर डोंगराच्या दिशेने एक रुंद चढणीचा मार्ग आहे तो थेट अंजनी गुफेकडे जातो, त्याच मार्गाने पुढे डोंगराच्या शिखरावर ही जाता येते. उंच भव्य शिळे खाली हनुमंताचे जन्म स्थळ आहे आणि मूर्तीची शिळा आहे. आम्ही गेलो तेव्हा गावातील बंधुजन आनंदी दिसत होते. गावातील मूल जवळ आली आणि त्यांनी अंजनी कुंड विषयी आम्हाला माहिती देखील दिली. मुलांच्या घोळक्यातून लखन आणि त्याची मित्र आम्हाला गुफेकडे  घेऊन गेलीत. इथे पिण्यासाठी पाणी आणि कोरडा आहार उपलब्द्ध आहे. गावातील लोकांनी इथले सौंदर्य जपून ठेवले आहे. पावसाळ्यात इथले सौंदर्य स्वर्गा पेक्षा कमी नसेल असे तुम्हालाही वाटूत राहील. उन्हाळ्यात देखील डोंगराची शीतल सावली आणि वारा वाहात असतो. आजूबाजूची हिरवळ पाण्याचे कुंड, ओढे, खडक, डोंगर यांना प्रभू श्री राम आणि भगवान हनुमान यांच्या पवित्र वास्तव्याचा स्पर्श झाला असेल असे वाटत राहते. इतके सुंदर रमणीय आणि अलौकिक असे हे अंजनिकुंड गाव आहे !

શ્રી હર્ષદ મહેતા (DCP સુરત ) દ્રારા "મિશન કોસાડ" અંતર્ગત સ્થાનીક લોકો સાથે સંવાદ સાધવામાં આવ્યો.

 29 જાન્યુઆરી 2023 ના રોજ અમરોલી પોલીસ સ્ટેશન દ્વારા માનનીય શ્રી હર્ષદ મહેતા સાહેબ DCP ZONE - 5ની અધ્યક્ષતામાં સાંજે 4 વાગે કોસા...